नांदेड| नांदेड शहरातील मात गुजरीजी विसावा उद्यान शिवाजीनगर नांदेड परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर 17 सप्टेंबर 2022 रोजी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत.
शनिवार 17 सप्टेंबर रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये हा आदेश निर्गमीत केला आहे. हा आदेश 17 सप्टेंबर रोजी (16 सप्टेंबर 2022 रोजीच्या मध्यरात्री) ते 17 सप्टेंबर 2022 रोजी 24 वाजेपर्यंत वरील नमूद परिसरात उपोषणे, धरणे, मोर्चा, रॅली, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात प्रतिबंध करण्यात आले आहे.
मतदान व मतमोजणी क्षेत्रातील आठवडी बाजार 18 व 19 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतदानाच्या दिवशी रविवार 18 सप्टेंबर रोजी निवडणूक हद्दीत व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत. अशा गाव / ठिकाणांचे आठवडी बंद ठेवण्यास आणि अन्य दिवशी भरविण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश
जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएल / बीआर-2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहे.
जिल्ह्यात मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 सपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 मतदानाच्या दिवशी सपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.मतमोजणीचा दिवशी सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियमावली, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.
19 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.