मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


औरंगाबाद|
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढयातील एक सुवर्णपान असून त्याची महती जगभर पोहोचणे आवश्यक आहे. समाजातल्या सर्व घटकांनी निर्धार आणि एकजूटीने हा संग्राम लढल्यानेच मराठवाडा मुक्त होऊ शकला असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढ्रण्यासाठी शासन निर्धाराने प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त  थोर स्वातंत्र्यता सेनानी श्री स्वामी रामानंद तीर्थ स्मारक व सेवाभावी संस्था परभणी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समितीकडून शहरातील तापडिया नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अभिमन्यू पवार, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह निशिकांत भालेराव, सुभाष जावळे, रामेश्वर शिंदे, अरूण मराठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाड्यात ज्याप्रमाणे रझाकारांनी अन्याय-अत्याचार केला. त्याचप्रमाणे कर्नाटक, तेलंगणा राज्यातील जनताही निजामाच्या जुलुमी राजवटीमुळे त्रस्त होती. तेथेही अनेकांनी बलिदान दिले. या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईमुळे देश एकसंघ ठेवण्यास मदत झाली. देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळाले असले तरी हैद्राबाद संस्थांनात मात्र शस्त्रांनी लढा जिंकावा लागला. अशाही परिस्थितीत येथील सेनानींनी अत्यंत संयमाने शस्त्रे वापरली. त्यामुळेच हा लढा ऐतिहासिक ठरला. या संग्रामाची महती देशभर पोहचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  मराठवाड्याचा अनुषेश भरुन काढण्यासाठी राज्य सरकार निर्धाराने प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले. येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असून पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळविण्याच्या प्रयत्नातून त्यास निश्चितच मदत होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण उघडे, राधाबाई खंडागळे आणि प्रल्हादसिंग ठाकूर यांच्या पत्नी वत्सलाबाई, स्वामी रामानंद तीर्थ यांचे नातू शिरीष खेडगीकर यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्कार केला. औरंगाबादपासून हैद्राबादला नेण्यात येणारी मशाल मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते प्रज्वलित करण्यात आली. अग्रसेन विद्या मंदिरातील आठवीतील विद्यार्थी स्वराज सूर्यवंशी याने मुख्यमंत्री यांचे काढलेले छायाचित्र मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिले.   

आमदार पवार यांनी लातुरला विभागीय आयुक्तालय निर्माण करण्यासह मराठवाड्यात क्रीडा विद्यापीठ, उद्योग, सभागृह, संगणकीकृत ग्रंथालयांची उभारणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर श्री.भालेराव यांनी आपल्या भाषणात मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. श्री. वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सुधीर बिंदू, जे.के. जाधव, पी.आर.देशमुख, आर.डी मगर, यशवंत कसबे, मुहमद इलियास, सखाराम काळे पाटील, भूपाल अरपाल, गोविंद पवार, मोहन देशमुख आदींसह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थ‍ित होते.

शिवाजी महाराज पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी  कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, सर्वश्री आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, नारायण कुचे, कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी