जिल्हा परिषदेच्यावतीने राबविलेल्या उपक्रमाबाबत डॉ. किरण जाधव यांनी केला गौरवपूर्ण उल्लेख
नांदेड, अनिल मादसवार| शासनाशी संबंधीत योजनेच्या लाभासाठी जो कोणी पात्र लाभार्थी येत असेल त्याला तशा सेवा कालमर्यादेत उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे जनतेचा सेवक या नात्याने कर्तव्य आहे. याचबरोबर लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या सेवांचा लाभ मिळणे हा त्याचा हक्क असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले. प्रशासनात अधिक संवेदनशीला जिथे दिसते त्या-त्या ठिकाणी सर्वसामान्यांची कामे जलदगतीने पूर्ण होतांना दिसतात. ही संवेदनशीलता नांदेड जिल्हा प्रशासनात ग्रामपंचायत पातळीपर्यंत योग्यरित्या जपल्या जात असून यात ॲपच्या माध्यमातून अधिक गतीमानता येईल असा विश्वास डॉ. किरण जाधव यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, व्ही. आर. पाटील, रेखा काळम व जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आपण साजरा करत आहोत. आपली सेवा समाजातील सर्वच घटकांसाठी आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या शासकीय कामांसाठी कार्यालयात येण्याची कोणतेही गरज पडू नये. यादृष्टिने उपलब्ध असलेले माहिती तंत्रज्ञान, शासन सेवेत त्याचा केला जाणारा वापर हा पुरेसा आहे. ज्यांना ही माध्यमे हाताळता येत नाहीत त्यांच्यासाठी संपूर्ण जिल्हाभर आपण सेवा केंद्राचे जाळे विणले आहे.
सर्वसामान्यांना उपयोगी असणाऱ्या 38 विभागातील 392 सेवा आपले सरकार सेवा केंद्र व ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनाबाबत व यासाठी विकसीत करण्यात आलेल्या आपले सरकार ॲपच्या हाताळणीबाबत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. हा केवळ आढावा नसून ग्रामीण पातळीवर अंमलबजावणी करतांना कोणाच्या चांगल्या सूचनाही येऊ शकतात. यादृष्टिनेही आयोग प्राधान्याने विचार करतो हे आपण लक्षात घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या नाविण्यापूर्ण उपक्रमांचा सचित्र आढावा त्यांच्या पुढे मांडला. माझी मुलगी माझा अभिमान, गाव तेथे स्मशानभूमी, गाव तेथे खोडा, माझी शाळा सुंदर शाळा, सुंदर माझे कार्यालय, जनावरांसाठी पाण्याचे हौद, सुनो नेहा, ग्रामीण आरोग्य सुविधा, मियावाकी घनदाट वृक्षलागवड आदी प्रकल्पांबाबत त्यांनी आकडेवारीसह सादरीकरण केले. या सादरीकरणाचा व जिल्हा परिषदेने राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्यावतीने ज्या सेवा दिल्या जातात त्यात प्रातिनिधीक स्वरुपात नवजात शिशुच्या रक्षणासाठी बेबी केअर किट, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनातील घरकुल पुर्ण केलेल्या 5 लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या चाव्या प्रातिनिधीक स्वरुपात डॉ. किरण जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.