नांदेड| जिल्ह्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यात उमरी तालुक्यातील सोमठाणा येथील ज्ञानेश्वर मारुती कोल्हेवाड वय २८ वर्ष व किनवट तालुक्यातील सुनील निवृत्ती मुंडे ३५ वर्ष गोकुंदा येथे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.
सोमठाणा (ता. उमरी) येथे ज्ञानेश्वर मारुती कोल्हेवाड (२८) यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. शिक्षण घेऊनही नाेकरी न लागल्यामुळे तसेच नापिकीमुळे कर्जबाजारी झाले होते. त्याला कंटाळून गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. बालाजी लिंगुराम पंतोजी यांच्या फिर्यादीवरून उमरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत गोकुंदा (ता. किनवट) येथे सुनील निवृत्ती मुंडे (३५, रा. निचपूर, ता. किनवट) यांनी शेतातील नापिकी आणि त्यात बँकेचे व खासगी कर्ज कसे फेडावे या चिंतेत विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली. त्यांना उपचारासाठी गोकुंदा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नारायण गंगाधर मुंडे यांच्या फिर्यादीवरून किनवट ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.