नांदेड| तमाम चर्मकार समाजाची अस्मिता असलेले बळीरामपूर नांदेड येथील श्री संत रोहिदास मंदिराची दरवर्षी माघ पौर्णिमेला जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष बाब म्हणून शासकीय महापूजा व्हावी व त्याची सुरुवात येत्या माघ पौर्णिमेपासून करावी अशी मागणी मंदिराचे संस्थापक वामनराव विष्णुपूरीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वामनराव विष्णुपूरीकर यांनी दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची ३ नोव्हेंबर २००८ रोजी भेट घेऊन बळीरामपूर नांदेड येथे श्री संत रोहिदास महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात यावे अशी भावना व्यक्त केली असता सदर प्रकल्पाच्या सर्वांगीन विकासासाठी अंदाजे २.२५ कोटीची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली. परंतु महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडून सदर निधी टप्प्याटप्प्याने परंतु धिम्म्या गतीने मिळत आहे. तसेच सदर तिर्थक्षेत्रास वर्ग ब चा प्रस्तावही शासनास सादर करण्यात आला असून जो शासनाच्या सकारात्मकदृष्ट्या विचाराधीन असल्याचे विष्णुपूरीकर यांनी सांगितले. मंदिराचे काम बर्याच प्रमाणात झाले असून उर्वरित कामासाठी निधीची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री संत रोहिदास महाराज यांचा जन्म माघ पौर्णिमेला काशी- बनारस- बाराणसी (उत्तरप्रदेश) येथे दलित समाजात झाला. त्यांचा जन्मदिन संपूर्ण देशभर मोठ्या हर्षोल्हासात साजरा केल्या जातो. त्याचप्रमाणे श्री संत गुरु रोहिदास तीर्थक्षेत्र बळीरामपूर, नांदेड येथेही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सदरची शासकीय महापूजा ही विशेष बाब म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात यावी व त्याची सुरुवात २०२२ च्या माघ पौर्णिमेपासून करावी अशी मागणी मंदिराचे संस्थापक वामनराव विष्णुपूरीकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.