नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्य उत्कृष्ट आहे. कोव्हीड काळात या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. यापुढील काळात कामाचे योग्य नियोजन करण्यात येईल. एक गाव एका महाविद्यालयाला दत्तक देण्यात येईल. त्या गावाच्या उनत्तीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मेहनत घेतील. याप्रकारे ‘एक गाव एक कॉलेज’ संकल्पना राबविण्यात येईल. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दि. १ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक कार्यक्रम नियोजन बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
या बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शरद बोरुडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक डॉ. शिवराज बोकडे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.
राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे म्हणाले केंद्र शासन आणि राज्य शासनाचासमन्वय साधून राष्ट्रीय सेवा योजनेचाविद्यार्थी तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वर्षभरात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या माध्यमातून चांगला संदेश गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अहमदनगर येथील प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शरद बोरुडे म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्य आणि प्रशिक्षित कार्यक्रम अधिकारी इतर विद्यापीठाच्या तुलनेत अधिक आहेत.याशिवाय चालू शै. वर्षाची वार्षिक नियोजन बैठक घेणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे.तसेच गतवर्षात केलेल्या कामाबद्दल सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंहबिसेन म्हणाले ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी विशेष संधी आहे. गावोगावी जावून विद्यार्थ्यांनी याबाबत देशसेवेची जागरूकता निर्माण केली पाहिजे. या बैठकीस चारही जिल्ह्यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याण सावंत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भागवत पस्तापुरे यांनी केले.