नांदेड। जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या प्रक्रियेत आज पाचव्या दिवशी बुधवार दिनांक 25 मे रोजी ग्राम पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या.
या विभागातील एकूण 77 बदल्या करण्यात आल्या असून यात प्रशासकीय 23 तर विनंतीने 54 बदल्या करण्यात आल्या आहेत. विस्तार अधिकारी पंचायत पदाच्या 4 बदल्या झाल्या. यात प्रशासकीय 3 तर विनंतीने 1 बदली करण्यात आली. विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाच्या 4 बदल्या झाल्या. यात प्रशासकीय 2 तर 2 बदल्या विनंतीने करण्यात आल्या. ग्राम विकास अधिकारी पदाच्या प्रशासकीय 3 तर विनंतीने 7 अशा एकूण 10 बदल्या झाल्या. ग्रामसेवक पदाच्या 59 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय 15 तर विनंतीने 54 बदल्यांचा समावेश आहे.
बदली प्रक्रियेत यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे व ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांची उपस्थिती होती. शासन निर्णयाच्या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. जिल्हयातील सर्व तालुक्यात असणा-या जागांच्या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्या करण्यात येत आहेत. पारदर्शक बदल्या केल्या बद्ल ग्रामसेवकांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा बुके देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस असून आज गुरुवार दिनांक 26 मे रोजी वित्त व पशुसंवर्धन विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. सकाळी अकरा वाजता पशुसंवर्धन विभागाच्या तर दुपारी एक वाजल्या पासून वित्त विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.