नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० प्रभावी अमलबजावणीकरिता दि. ४ ऑक्टोबर रोजी दु. ०३:०० वा. शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे मार्गदर्शन अभासी (ऑनलाईन) पद्धतीने होणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय नियोजितस्थळी विविध तज्जांचे प्रत्यक्ष (ऑफलाईन) मार्गदर्शन होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० प्रभावी अमलबजावणीकरिता प्रत्येक घटकांचा सहभाग असावा या उद्देशाने उच्च शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर याबाबतची जागरुकता करणे आवश्यक आहे. त्यानुसार एकाचवेळी विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यासाठी शहरातील आयोजन यशवंत महविद्यालयातर्फे कुसुम सभागृह येथे करण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यासाठी दयानंद कला महाविद्यालयातर्फे दयानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी शहरातील शिवाजी कॉलेजमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी शहरातील आदर्श महाविद्यालय येथे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यशाळेस सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्वच शिक्षकांनी त्या-त्या जिल्ह्याच्या नियोजित स्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी कळविले आहे.