नांदेड| गुंठेवारी प्रकरणे विनाकारण आर्थिक लोभासाठी प्रलंबीत ठेवून जमिनधारकांची अडवणूक होत आहे. सदरील प्रकार हा गंभीर असून यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून प्रलंबीत गुंठेवारी प्रकरणे निकाली काढावी. गुंठेवारी संचिका तुंबविणार्या अधिकार्यांची चौकशी लावून हे काम उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सोपवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज बिग्रेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी दिला आहे.
शहरी भागातील गुंठेवारीची प्रकरणे जशी महानगरपालीकेतून निकाली काढली जातात, तशी नांदेड तालुका ग्रामीणच्या गुंठेवारी संचिका निकाली काढण्याची जबाबदारी महसुल विभाग पार पाडत असते. त्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल केले जातात. या प्रकरणाचा निपटारा याच कार्यालयामार्फत होत असतो. प्लॉट खरेदी-विक्रीसाठी एन.ए. किंवा गुंठेवारी आवश्यक करण्यात आल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात गुंठेवारीसाठी प्रस्ताव दाखल केले जात आहेत. नांदेड तालुक्यातूनही असे हजारो प्रस्ताव महसुल विभागाकडे दाखल झाले आहेत.
उपविभागीय अधिकारी माने यांना गुंठेवारीचे अधिकार देण्यात आले असले तरी जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे सदरील प्रकरणे सोपविण्यात आल्याने गुंठेवारीच्या प्रकरणाची साठमारी होत असल्याची तक्रार नागरिकांतून व्यक्त होत आहे. काही प्रकरणे ही जलदगतीने तर काही प्रकरणे कासव गतीने सरकत असून संचिका तुंबवून ठेवण्यात आल्या आहेत. या संचिका रितसर निकाली निघाल्यास शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसुल जमा होणार आहे. या प्रकरणात गुंठेवारी संचिका तुंबविणार्या अधिकार्यांची चौकशी करून सदरील प्रकरणे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सोपवा अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.