इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी ऑनलाईन जाहीर होणार -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाईन शुक्रवार 2 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर होणार असून निकालाची कार्यपद्धती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे राहिल. 

राज्यात नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार 2 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वा. जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.  

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इयत्ता 10 वीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.  

गुणपडताळणीसाठी शनिवार 3 सप्टेंबर ते सोमवार 12 सप्टेंबर 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार 3 सप्टेंबर ते गुरुवार 22 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबीट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीआय, नेटबँकिंग याद्वारे भरता येईल.  

जुलै-ऑगस्ट 2022 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.  

सन 2023 मधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे व आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आहेत.  

मार्च 2022 मध्ये प्रथम नोंदणी करुन परीक्षेस उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुण सुधार (क्लास इम्प्रोव्हमेन्ट स्कीम) योजनेतर्गंत परीक्षेस दुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. मार्च 2022 परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारण्यासाठी मार्च 2023 परीक्षा ही अंतिम संधी असेल यांची नोंद घ्यावी. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी