मालेगाव/नांदेड| अर्धापूर पोलीस स्थानकाच्या हद्दी मध्ये येणाऱ्या मालेगाव परिक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून चोरांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे जयकुमार सज्जनलाल जयस्वाल वय 53 व्यवसाय ऑटो चालक हे आपल्या घरामध्ये झोपलेले असताना लघुशंकेसाठी बाहेर आले. त्याच वेळेस चोरट्यांनी याचा फायदा घेत जयस्वाल यांच्या घरात प्रवेश केला तसेच घरातील साहित्य घराच्या समोर आणून त्यामध्ये पाहणी सुरू केली.
त्यात पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम व इतर काही शैक्षणिक प्रमाणपत्रे चोरट्यानी लंपास केले हे घडत असताना जयस्वाल हे पुन्हा आपल्या खोलीमध्ये जाण्यासाठी आले. त्यावेळी एक चोर त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा जयस्वाल यांनी त्या चोराला पकडून धरले. परंतु घरामध्ये गेलेल्या दुसरा चोर लगेच बाहेर आला व जयस्वाल यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. त्यामुळे जयस्वाल हे जखमी होऊन खाली कोसळले.
विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर काही वेळानीच चोरट्यांनी माधव बुट्टे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला घराला कुलूप लागलेले दिसताच घरातील झडाझडती घ्यायला सुरुवात केली. पण त्या ठिकाणी चोरांच्या हाताला काही लागले नाही. विशेष म्हणजे चोरांचे प्रमाण वाढल्यामुळे रात्री कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी पप्पू चव्हाण व सतिश लहानकर हे गावातील इतर भागांमध्ये गस्त घालत होते. परंतु मालेगाव गावचा परीसर मोठा असल्यामुळे तसेच मालेगाव परिक्षेत्रात एकूण 16 गाव येत असल्यामुळे पोलिसांनाही चोरांवर अंकुश ठेवणे आता अवघड झाले आहे.
16 गावांपैकी एका गावात जरी एखादी घटना घडली तर पोलिसांना त्यांच्या दुचाकीवर त्या ठिकाणी जावे लागते. मग इतर 15 गावे मात्र वाऱ्यावर राहतात म्हणून मागील अनेक महिन्यापासून स्थानिक नागरिकांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे मालेगाव चौकीसाठी एक चार चाकी वाहन तसेच किमान रात्रीच्या वेळेला चार पोलीस कर्तव्यावर पाठवावे अशी मागणी होत आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.