नांदेड| स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उच्च शिक्षणामध्ये क्रांतिकारक असा बदल होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठे व संलग्नित सर्व महाविद्यालयांना लागू करण्यात येणार आहे. या धोरणामध्ये कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इतर कोणत्याही शाखेतील आवडीचे विषय घेऊन स्वतःचा विकास साधू शकतो. अशा या बहुआयामी शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य होणार आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये शुक्रवार दि. २३सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी बाबतीत संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यासमवेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा सभागृहामध्ये बैठक पार पडली. यावेळी मंचावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे,मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, आय.क़्यु.सी. चे संचालक डॉ. डी. डी. पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.
कुलगुरू पुढे म्हणाले या बैठकीमध्ये प्राचार्यांना या धोरणाबद्दल पूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढील टप्पा परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यावर संबंधित जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना तज्ञ व्यक्तीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आणि यामधील तिसरा टप्पा या सर्व शिक्षकांनी आपापल्या महाविद्यालयांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या धोरणाबाबतीत अवगत करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बहुआयामी शिक्षण पद्धतीनुसार विज्ञान शाखेतील विद्यार्थी कला आणि वाणिज्य शाखेतील आवडीचे विषय घेऊन परीक्षा देऊ शकतो. त्याचबरोबर कला व वाणिज्यचे विद्यार्थी सुद्धा विज्ञान शाखेतील आवडीचे विषय घेऊ शकतो. विद्यार्थी २०ते ४० टक्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीने एनपीटीएलच्या स्वयंम मधून आवडीचे विषय घेऊन आपले क्रेडिट तयार करू शकतो. यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एबीसी म्हणजेच अकॉडेमीक बँक ऑफ क्रेडिट मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये काही कारणास्तव जरी अंतर पडला तरी उर्वरित शिक्षण पुन्हा घेऊन ती पदवी पूर्ण करता येईल. याशिवाय विद्यार्थ्यांना तीन वर्षाची पदवी घेतली तर दोन वर्षाची पदव्युत्तर करता येणार आहे. आणि जर चार वर्षाची पदवी पूर्ण केली तर एका वर्षातच पदव्युत्तर पदवी घेता येणार आहे. चार वर्षाच्या पदवीमध्ये शेवटचे चौथे वर्षे हे संशोधनपर असणार आहे.
यापुढे महाविद्यालयांना स्वायत्ततेवर जास्त भर द्यावा लागणार आहे. लहान महाविद्यालयांना एकत्र घेऊन क्लस्टर तयार करता येणार आहे. आणि शेवटी त्यांना स्वतःचे विद्यापीठ तयार करता येणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा उच्च शिक्षणासाठी खूप महत्त्वाचा आहे. जे महाविद्यालय आणि शिक्षक मेहनत घेतील तेच पुढे येतील, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षकांना व महाविद्यालयांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.