नांदेड। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नांदेड येथून श्रीक्षेत्र शेगाव येथे जाणाऱ्या पायी दिंडी पालखीचे प्रस्थान मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात आज सकाळी झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भक्तगण उपस्थित होते. ग्रामीण भागातून विविध ठिकाणच्या भजनी मंडळांनी सहभाग घेतला.
येथील मालेगाव रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिर तरोडा खु. येथून प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही पायी दिंडी यात्रा काढण्यात आली. दिंडीचे हे 18वे वर्ष आहे. शेगावकडे दिंडीचे प्रस्थान होणार असल्याने सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. यावेळी पूजा विधी व महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर या पायी दिंडी यात्रेचे प्रस्थान झाले. दुपारी ही पायी दिंडी यात्रा मालेगाव पोंहचली असून आज रात्री वसमत येथे मुक्काम राहणार आहे, आणि उद्या पुढील मार्गावर मार्गस्थ होणार आहे.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.तुकाराम तळणकर, दिंडीचे प्रमुख उत्तमराव कल्याणकर, विश्वनाथराव कल्याणकर, उमेश तळणकर, गिरी महाराज, भरत येमेकर यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील शिरपूर, परभणी जिल्ह्यातील आरळ, नांदेड जिल्ह्यातील मुरंबा भजनी मंडळासह मोठ्या प्रमाणात भक्तांचा सहभाग होता.