नांदेड। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) दिनांक 13 ते 15 ऑगस्ट,2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यत, तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन नांदेड येथील रल्वे स्थानकात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, चित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र आणि माहिती स्वरुपात माडण्यात आली आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे.
या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन हर घर तिरंगा अभियानाच्या प्रारंभ दिनी दिनांक 13 ऑगस्ट,2022 रोजी सकाळी ११ वाजता नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार श्री बालाजीराव कल्याणकर, आमदार श्री राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, दक्षिण मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक श्री कोंडेटी नागभूषण, नांदेड रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक श्री काली चरण, जनसंपर्क अधिकारी श्री राजेश शिंदे, आकाशवाणी नांदेडचे प्रमुख आनंद ठेंगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सूमित दोडल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.