मुंबई| मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गैरप्रकाराबाबत रुबी हॉल क्लिनिक, पुणे वानवडी येथील इनामदार हॉस्पिटल, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि व्यवस्थापन यांची चौकशी करण्यात येईल. दोषी डॉक्टर अथवा व्यवस्थापन यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. ही चौकशी कमीत कमी कालावधीत पूर्ण केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासन ठोस पाऊले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील घटनेबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडला होता.
त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नवजात जुळ्या बालकांचा उपचाराअभावी मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. शासनाने ही घटना अतिशय गंभीरपणे घेतली असून आदिवासी भागात चांगल्या दर्जाचे रस्ते असावेत. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पूल दुरुस्तीची कामे हाती घेणार आहोत. या भागाच्या विकासासाठी शासन ठोस पाऊले उचलणार आहे आणि या भागात अशाप्रकारे घटना घडू नये त्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा कामकाज/शासकीय विधेयक वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या आहेत. त्या हिताच्याच आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आले त्यावर सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, नाना पटोले व रवींद्र वायकर यांनी सूचना मांडल्या. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
केंद्र सरकार जीएसटी संदर्भात एकटे निर्णय घेवू शकत नाही. तसेच राज्य शासन देखील निर्णय घेवू शकत नाही. केंद्र व राज्यांनी एकत्र येवून हा कायदा बनवला आहे. त्यामुळे यामध्ये होणाऱ्या सुधारणा देखील पूर्णपणे दोघांच्या संमतीनेच होतात. या विधेयकात सुधारणा करताना परतावा भरण्यासंदर्भातच सुधारणांवर भर देण्यात आला आहे तसेच इंधनदरवाढ होवू नये, यासाठी शासन सातत्याने निर्णय घेत आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
जात – वंश – धर्म - भाषाविषयक भेदभाव न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील प्रतिज्ञा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली. यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सामूहिक प्रतिज्ञा घेतली.