मुंबई| राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.
ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. मात्र काही ठिकाणी वर्ग खोल्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यापक बैठक बोलावली जाईल. वर्ग खोल्यांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत आणि खोल्यांच्या बांधकामाबाबत धोरण ठरविण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील शाळांच्या खोल्या बांधण्यासाठी शिर्डी संस्थानने निधी दिला होता. मात्र त्यासाठी मंजुरी आणि वर्ग खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करायचे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मराठवाडा विभागातील जुन्या शाळांच्या पुनर्बांधणी निधी उपलब्ध करून दिला जाईल, राज्य शासनाच्या माध्यमातून विकास तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील शाळांचे निसर्ग वादळाने नुकसान झाले आहे. त्याबाबतही एक बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.
अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत जबाबदार धरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्या नमिता मुंदडा, अबू आझमी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत सविस्तर तपास सुरू आहे. त्याबाबतचा एक अहवाल मिळाला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल. त्याचबरोबर तेथील पोलीस उपअधीक्षक यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती केली जाईल.
राज्यातील विविध ठिकाणच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याच्या सूचना पोलीस महासंचालक यांना दिल्या जातील. दोषी आढळल्यास अंबाजोगाई प्रमाणेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांची कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांच्या सीमेला लागून आहे, त्या जिल्ह्यांत अवैध दारूबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार - मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम) रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य सुनील प्रभू आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, मुंबई - गोवा महामार्गाचे सर्व काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी २५ ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल. त्यानंतर पाहणी दौरा केला जाईल. मुंबई गोवा महामार्गावरील काम गतीने होण्यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जाईल. परशुराम घाट आणि कशेडी घाटातील कामकाज अधिक सुरक्षित होण्यासाठी टेरी संस्थेचा सल्ला घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, रवींद्र वायकर, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.
अवैध गर्भपातामुळे मृत्यूची विशेष पथकामार्फत चौकशी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती
बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य लक्ष्मण पवार, डॉ भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बक्करवाडी प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीनुसार तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई केली जाईल, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत सदस्य राजेश टोपे, देवयानी फरांदे, आशिष शेलार, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.