महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


नवी दिल्ली|
पीक पध्दतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीति आयोगाच्या बैठकीत सांगितले.

नीति आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांनुसार राज्यसरकार विविध उपयायोजनांच्या माध्यमातून देश विकासात सहभाग देईल असा विश्वासही श्री.शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केला. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित या बैठकीस गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, देशातील राज्यांचे मुख्यमंत्री, सचिव आदि उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव या बैठकीस उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘नीति आयोगाच्या नियामक परिषदे’च्या सातव्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीविषयी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, धैर्यशिल माने यावेळी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्यातील पडीक जमीन बागायती शेतीखाली आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील चार लाख हेक्टर अन्य व पडीक जमीन बागायती शेतीखाली  आणण्यात आली आहे. एकात्मीक बागायती विकास मिशन अंतर्गत (एम.आय.डी.एच) 2015 मध्ये करण्यात आलेले नियम कायम असल्याने  बागायती शेती विकासास अडसर निर्माण होत असून या मानदंडावर पुनर्विचार करण्यात यावा, अशी सूचनाही श्री.शिंदे यांनी बैठकीत केली.

राज्यातील जमीन सिंचनाखाली आणण्यात जलयुक्त शिवार योजना सहाय्यभूत ठरली असून या योजनेमुळे  डाळ व कडधान्य वर्गीय पिकांचे उत्पादन वाढले आहे. राज्यसरकार या योजनेस प्रोत्साहन देणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्याची कटीबध्दता 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन कटीबध्द असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी श्री.शिंदे यांनी केली. डिजीटल मूलभूत सुविधा स्थापित करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुस) राज्यातील आकांक्षीत जिल्हे आणि दुर्गम भागात उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्यतेची गरज आहे.

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी  महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. भारत नेट कार्यक्रमांतर्गत शाळांना डिजीटल करण्यासाठी  ब्रॉडबँड सेवेने जोडण्यात येणार  आहे. राज्यातील कोणतीही शाळा ‘एक शिक्षकी’ राहणार नाही यावर राज्याचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या योगदानाप्रती कृतज्ञभाव दर्शविण्यासाठी ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ग्रीन फिल्ड शहर निर्माण करण्यावर शासनाचा भर असून या अंतर्गत नवी मुंबई जवळ 400 चौ.कि. क्षेत्रावर शहरी केंद्र  उभारण्यात येत आहे. 700 कि.मी. च्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर 20 स्मार्ट शहरे उभारण्यात येत आहेत.  राज्यशासनाने 28 जुलै 2022 रोजी शहर सौंदर्यीकरण कार्यक्रमास सुरवात केली असून याव्दारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शहर सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याने त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी