नांदेड| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात मानवी साखळी करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
मानवी साखळी मधून एकात्मतेची भावना निर्माण होईल. याप्रसंगी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमात प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. यासाठी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना सदर कार्यक्रमाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक गावात मानवी साखळी मध्ये शालेय विद्यार्थी, महिला, युवक-युवती, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी घ्यावा. मानवी साखळी करताना मुलांची, महिलांची व पुरुषांची स्वतंत्र मानवी साखळी तयार करावी. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत आदी ठिकाणी मानवी साखळीचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.