म.रा.वि.वि. कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याच्या लेखी आश्‍वासनामुळे राष्ट्रीय मातंग संघाचे आंदोलन तात्पुरते स्थगित -NNL


नांदेड|
येथील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत एका कर्मचार्‍याकडून औरंगाबाद येथे वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या भावाची भीती दाखवत आपला मनमानी कारभार करत वीज वितरण कंपनीच्या लाखो रुपयांची लूट केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय मातंग संघाचे अध्यक्ष भारत खडसे हे दि. १४ ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार होते. परंतु कंपनीचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दोषी व भ्रष्ट अधिकार्‍यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने सदरील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. नांदेड परिमंडळातील डी.वाय.सी.आर.आर. ओ. या पदावर कार्यरत असलेले महेंद्र बागुल हे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार पुरविणार्‍या कंत्राटदारांची बिले तपासण्याचे काम पाहतात. बिलामध्ये काही त्रुटी असतील व कोणी चुकीचे बिले सादर करत असेल तर सदर बिले नाकारण्याचे अधिकार त्यांना असून ते प्रत्येक महिन्याला चुकीचे बिले मंजूर करत कामगारांचे पी.एफ.ई. एस.आय., इन्शुरन्स, लेबर लायसन्स, लेबर वेलफेअर फंड भरण्याची गरज नाही असे सांगून इतर ठिकाणच्या कामगारांचे चॅनल जोडून मंजूरी देतात व माझे भाऊ प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद येथे मोठ्या पदावर कार्यरत असल्याने माझी चौकशी करण्याची हिंमत कोणामध्येही नाही असे सांगून वीज वितरण कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करत असल्याचे राष्ट्रीय मातंग संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.

या निवेदनाची दखल घेत विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी भारत खडसे यांना जा.क्रं. अअ/मंकानां/मासं/२७०२ दि. १४.०८.२०२२ नुसार लेखी पत्र देऊन दोषी व भ्रष्ट अधिकार्‍याविरुद्ध कंपनीच्या नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे कळविले आहे. त्यामुळे भारत खडसे यांनी त्यांचे बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. जर या उपरही त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर यापुढे तीव्र लढा उभारणार असल्याचे राष्ट्रीय मातंग संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत खडसे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी