नांदेड| मनुष्याच्या जीवनात संतांची संगत आवश्यक आहे. प्रत्येकांनी आपला जीवनरुपी भवसागर तरून नेण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, असे मौलिक मार्गदर्शन हभप श्री पंढरीनाथ महाराज मुरकुटे यांनी केले.
येथील माहेश्वरी भवनात सत्संग उत्सव समिती नांदेडच्यावतीने आयोजिलेल्या श्री मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजिलेल्या भजन-कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द डॉ.बाळासाहेब साजने, रामेश्वर तोष्णीवाल, जिव्हिसी ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी संतांच्या विषयी दिलेल्या एका अभंगावर हभप पंढरीनाथ मुरकुटे म्हणाले की, संत हे श्रेष्ठ आहेत. त्यांना कधीच वितुष्ठता येत नाही. कारण त्यांना दुःख आणि सुख याचा परिणाम दिसत नाही. ते दोन्हीमध्ये सारखे असतात. ते संतुष्ट असल्यामुळे त्यांना वितुष्ठ येत नाही. कोणतेही संकट आले किंवा दुःख झाले, किंवा सुख मिळाले त्याचा परिणाम संतांवर होत नाही. संतांची भेट दुर्लभ आहे, अवघड आहे.
मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. या मनुष्य जीवनात संतसंगती महत्वाची आहे. मनुष्याने जन्माला आल्यानंतर काय सार्थक केले असाही प्रश्न शेवटी उपस्थित केल्या जातो. त्यामुळे संतांच्या संगतीत राहणे आणि संतांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार चालणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संतांशिवाय देवाची सुध्दा प्राप्ती होत नाही. संतांची कृपा झाल्यास लोखंडाचेही सोने होते. संतकृपा प्रसादाने मनुष्य भवसागरातून तारल्या जातो असे मौलिक मार्गदर्शन आपल्या रसाळ वाणीतून हभप श्री पंढरीनाथ महाराज मुरकुटे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भक्त श्रोत्यांनी उपस्थिती होती.