मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दहीहंडी मंडळांना दिल्या भेटी -NNL


ठाणे|
दहीहंडी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहर व परिसरातील विविध भागांतील मंडळांना भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढविला.

गोपाळकाला निमित्त ठाणे शहरातील विविध मंडळांनी आज दहीहंडी उभारली होती. वेगवेगळ्या भागातून ही हंडी फोडण्यासाठी तरुण ठाण्यात जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी टेम्भी नाका, खेवरा सर्कल हिरानंदानी मिडोज, किसन नगर शाखा, वर्तक नगर, कोपरीतील अष्टविनायक चौक, रघुनाथ नगर, बाळकुम आदी ठिकाणच्या दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या. तसेच मीरा भाईंदर, भिवंडी येथील मंडळांनाही मुख्यमंत्री महोदयांनी भेटी देऊन गोविंदा पथकाच्या तरुणांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. श्री. शिंदे म्हणाले की, गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा उत्सव साजरा करण्यास निर्बंध होते. मात्र यंदा हा उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय अतिशय उत्साहात साजरा करावा. गणेशोत्सव, नवरात्र हे उत्सवही उत्साहात साजरे करावेत.

पारंपरिक दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदासाठी राज्य शासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जखमी गोविदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच गोविंदाचा विमा उतरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनीही हिरानंदानी मेंडोज येथील स्वामी प्रतिष्ठाण, वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान, भिवंडी येथे भेट दिली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी