अर्धापूर, निळकंठ मदने| नांदेड जिल्हा हद्दीसह महाराष्ट्रात रस्ते विकासाचे काम चालू आहेत. त्यासाठी लाखो झाडे तोडण्यात आले आहेत. यात नागपूर-नांदेड- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ याचे काम करत असताना देखील झाडे तोडण्यात आले. ३६१ हा महामार्ग तुळजापूर पासून बुटीबोरी (नागपूर) पर्यंत आहे.
या महामार्गाची एकूण लांबी ५४८ कि.मी. आहे. हा महाराष्ट्रातील अनुक्रमे उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या ६ जिल्ह्यांतून जातो. हा मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातून जातो. या महामार्गावरील तुळजापूर, औसा, लातूर, चाकूर, अहमदपूर, लोहा, नांदेड, अर्धापूर , हदगाव ,उमरखेड, पुसद, यवतमाळ, वर्धा आणि बुटीबोरी हे शहरे आहेत. पर्यावरण विभागाच्या नियमानुसार त्याठिकाणी परत त्या झाडाच्या पट्टीमध्ये झाडे लावणे व संवर्धन करणे आवश्यक आहे. पण सध्या स्थितीला तसे दिसत नाही. सध्या लावलेली झाडे खडकाळ व डांबर असलेल्या भागात वरवरच लावलेली आहेत आणि ती एवढा पाऊस असताना देखील वाळून पण गेली आहेत. त्यामुळे संबंधित गुत्तेदाराला तेथे झाडाची परत लागवड करून किमान तीन ते पाच वर्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी.
शेकडो वर्षाचे झाडे तोडताना पर्यावरण प्रेमीनी विरोध केला होता पण त्या बदल्यात झाडे लावून संवर्धन करण्याची हमी दिल्यामुळे पर्यावरणप्रेमी बाजूला झाले होते. पण बोलल्याप्रमाणे झाडे लावून त्याचे संवर्धन आता होत नाही. केवळ बील निघण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी असलेल्या नियम पूर्णता करुन चालणार नाही. झाडे लावून त्याचे संवर्धन आवश्यकच आहे. तरी त्यांना परत व्यवस्थित सुपीक मातीत, सुरळीत, पाणी पुरवठा कीटकनाशक व गुरांपासून सुरक्षेच्या संदर्भाने व्यवस्था करून झाडे लावून संवर्धन करण्याची मागणी निवेदनाद्वारे नांदेडच्या जिल्हाधिकारी साहेबांना पर्यावरण प्रेमी तेर्फे परमविश्व फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी केली आहे. मागणीची पुर्तता न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा निवेदनातून त्यांनी दिला आहे.