कॉ.के.के.जांबकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नांदेड| अस्वस्थता व बेचैनी हे जिवंतपणाचे लक्षण असते,समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्याचे कार्य कॉ.के.के.जांबकर यांच्या लेखणीतून झाले आहे,असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांनी केले.कॉ.के.के.जांबकर यांच्या ‘वास्तव आणि प्रखर विचार’ या ग्रंथाचे प्रकाशन येथील कै.नरहर कुरुंदकर सभागृहात प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांच्या हस्ते (दि.16) मंगळवार झाले.
अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे होते.प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, सी. ए. डॉ.प्रविण पाटील, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, माजी आ.गंगाधरराव पटणे, लेखक कॉ. के. के. जांबकर, सौ.सविता जांबकर प्रा.राजाराम वट्टमवार उपस्थित होते.प्रारंभी छ.शिवाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.लेखक कॉ.जांबकर यांनी लेखनामागची भूमिका मांडली.
प्रामाणिक कार्यकर्ता हे डाव्या चळवळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.प्रश्नांना न्याय देण्याचे व वंचित घटकांचा आवाज होण्याचे कार्य डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे असे डॉ.रोडे पुढे बोलताना म्हणाले.यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी समृद्ध जगण्याकडे पाठ फिरवून वंचितांची दु:खांना आपलेसे करण्यासाठी लागणार्या निर्भयतेचा गौरव केला.लेखणी आणि कार्यकर्तापण जपणे हे कठीण कार्य असून कॉ.जांबकरांनी ही सांगड घालून जपलेला निर्भिडपणा हा गौरवास्पद असल्याचे सांगितले.वैचारिक भ्रष्टाचाराविरूद्ध लढणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे डॉ.प्रविण पाटील म्हणाले.
कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी चळवळीतील अनुभव सांगून कॉ.जांबकरांच्या कार्याचा गौरवपूर्व उल्लेख केला. गजानन कुलकर्णी व संचाने क्रांतीगित सादर केले.अध्यक्षीय समारोपात डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी सामाजिक विचारांची शक्ती वाढविणे ही आजची गरज असून डाव्या विचारांच्या चळवळी या सर्वसामान्यांचा आवाज असल्याचे सांगितले. चळवळींच्या प्रश्नांना विचारात घेण्याची गरज डॉ.काब्दे यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचलन सौ.सोनाली सचिन मार्कंडेय यांनी केले तर प्रास्तविक सौ. मधुरा उमेश खारकर यांनी केले केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मिथिला गिरीराज जांबकर यांनी मानले.