जीवन गाण्यातील संवेदना जेंव्हा कारागृहातील कैदी जपण्यासाठी कटिबद्ध होतात, माणुस म्हणून जगण्यासाठी कटिबद्ध होऊ- न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज -NNL

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रम


नांदेड।
जन्मताच कोणताही व्यक्ती हा गुन्हेगार असत नाही. माणसाची वृत्ती ही गुन्हेगारीच्या पातळीवर कोणालाही घेऊन जाऊ शकते. आपल्याकडून काही तरी गंभीर चुका या झालेल्या आहेत म्हणून तुम्ही आज या कारागृहाच्या भिंतीत बंदिस्त आहात. छोट्या-छोट्या कारणांमुळे माणसाची हिंसक वृत्ती वाढत आहे. याला जर टाळायचे असेल तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवून सदैव परिवार आणि समाजाचा विचार कराल तेंव्हा तुम्ही गुन्हेगारी वृत्ती पासून प्रवृत्त व्हाल असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याचे मूल्य व परस्परांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, मानवतेचे मूल्य सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने आज येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हा उपक्रम राज्यातील सर्व कारागृहात घेण्यात आला.

आपण कोणाचे तरी भाऊ आहोत. आपण कोणाचा तरी मुलगा आहोत. आपल्या आई-वडिलांना आपल्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपण ज्या समाजात राहतो त्या सर्वांचे हित जपण्याचे कर्तव्य एक नागरिक म्हणून आपल्याकडून अभिप्रेत आहे. ज्या चुका आपल्याकडून आयुष्यात घडल्या त्याला इथेच विसरून आपण या बंदिगृहातून बाहेर या. नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याच्या पालनासह समाजासाठी ही मोठे योगदान भविष्यात आपण द्याल, असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला. कोणताही व्यक्ती जन्मताच गुन्हेगार असत नाही. यावर नितांत विश्वास ठेवा. तुमच्यातही मानवी संवेदना जीवंत आहेत. एक नागरिक म्हणून आपली देशाला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्त्व पटावे, त्यांचे प्रबोधन व समुपदेशन व्हावे या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम घेत असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक कलावंत प्रा. कैलास पपुलवाड, प्रजापती भिसे, अभिजित वाघमारे, विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे, अनिल दुधाटे, सिद्धांत दिग्रसकर, वैष्णवी इंगळे, अंजली आदींनी देशभक्तीपर गिते सादर केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी