माहूर। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड अंतर्गत मौजे वानोळा, पाचोंदा,मांडवा, पानोळा ता.माहुर या चार गावाकरिता निचपुर तलावातुन मा.खा.डि.बी.पाटील यांच्या कारकिर्दीत ही संयुक्त पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली होती. या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरूवाती पासुनच निकृष्ठ दर्जाचे व थातुर-मातुर करण्यात आल्याने सुरूवातीचे काही दिवस ही योजना व्यवस्थित चालु होती. मात्र गेल्या दहा वर्षापासुन ही पाणीपुरवठा योजना बंद पडली असुन आज मरणासन्न अवस्थेत आहे.
याच योजनेच्या नावाखाली आजतागायत वानोळा ग्रामपंचायतने लाखो रुपयाचा निधी उचलुण दुरुस्तीचे काम झाल्याचे भासवुन नागरिक व शासनाची फसवणुक केलेली आहे. सदर योजनेवर जि.प.नांदेड चे नियंत्रण असल्याने सदर ही योजना देखभाल व दुरुस्तीसाठी वानोळा ग्रामपंचायत कडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. परंतु वानोळा ग्रामपंचायतीने सदर पाणीपुरवठा योजना वानोळा ग्रामपंचायत ला वर्ग करण्यात आली नसल्याचे पत्र दिले आहे.
सदर योजना जर वानोळा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली नसेल तर सुरुवातीच्या काळापासुन आजपर्यंत वानोळा ग्रामपंचायत ने योजनेच्या दुरुस्तीच्या नावाखाली शासनाकडुन मंजुर झालेल्या निधीतुन काम झाल्याचे भासवुन देयके उचलुन निधी कोणत्या आधारे हडप केली याचे संशोधन आवश्यक आहे.
उपरोक्त नमुद पाणीपुरवठा योजनेच्या सुरुवातीच्या काळापासुन आजपर्यंत मंजुर झालेल्या निधीमधून नेमके कोणते दुरूस्तीचे काम करण्यात आले. हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुरुस्ती साठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा चारही गावांना या योजनेच्या माध्यमातुन पाण्याचा थेंब देखील मिळाला नाही ही खेदाची बाब आहे. तसेच या ठिकाणी देखरेखीखाली ठेवलेल्या कर्मचाऱ्याला गत दहा वर्षापासुन किती पगार देण्यात आला याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी.
सदरील योजनेची तत्काळ सखोल चौकशी करुन शासनाकडून वारंवार प्राप्त झालेल्या निधीतुन निकृष्ठ काम करून पाणी पुरवठा योजना अद्यापही सुरळीत चालु न झाल्याने याबद्दल दोषी असणाऱ्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासुन ते आजपर्यंत या योजनेशी सबंधित सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी. सदरील पाणीपुरवठा योजना सुरळीत करुन वानोळा, पानोळा, पाचोंदा, मांडवा या गावातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा यासंबंधीचे निवेदन तहसीलदार माहुर,उपविभागिय अधिकारी किनवट,पंचायत समिति माहुर्, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा योजना उप विभाग,किनवट यांना देण्यात आले. या निवेदनावर दीडशे लोकांची स्वाक्षरी आहे.