समूह राष्ट्रगीत गायनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा झाल्या सज्ज -NNL

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नागरिकांनाही राष्ट्रगीत गायनासाठी आवाहन

17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. आहात तेथे थांबून देशासाठी करू यात अभिवादन   


नांदेड|
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर “घरोघरी तिरंगा” व इतर उपक्रम आपण मोठ्या उत्साहात साजरे केले. याला जोडूनच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात सकाळी 11 वा. स्वराज्य महोत्सवाचा भाग म्हणून “समूह राष्ट्रगीत गायन” गायले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात याची जय्यत तयारी सुरू असून या उपक्रमात नागरिकांसह सर्व शाळा हिरीरीने सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. याच्या पूर्व तयारीसाठी आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

स्वराज्य महोत्सवाअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनासाठी यशस्वी अंमलबजावणी व्हावी यादृष्टिने सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. हे समूह राष्ट्रगीत गायन 17 ऑगस्ट रोजी सकाळी बरोबर 11 वा. एकाचवेळी राज्यातील सर्व दूर्गम भागातील पाड्यांसह महानगरात गायले जाईल. यासाठी राज्यातील सर्व खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था / विद्यापिठे यामधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग उत्स्फूर्त असणार आहे. सकाळी 11 वा. राष्ट्रगीताला सुरूवात होईल व 11.1 मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, हे शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

समूह राष्ट्रगीत गायनाचा वेळी जाणते, अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याबाबत सर्व स्तरावर काळजी घेण्याचेही आवाहन शासनाने केले आहे. राज्यातील नागरिकांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. ते ज्या ठिकाणी असतील त्याठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचेही आवाहन शासनाने केले आहे. राज्यातील सर्व खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, केंद्र व राज्य शासनाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. 

राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्गखोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रीत उपस्थित राहून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रामस्तरावर व शहरात वार्ड स्तरावर सर्व प्रशासकीय अधिकारी व  पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. यासाठी ग्रामविकास, पंचायतराज विभाग व नगरविकास विभाग यांनी सर्व समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करायचा आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी