जिल्हाधिकारी यवतमाळ यांना कार्यवाही करण्यासाठी केली चर्चा..
उमरखेड। उमरखेड तालुक्यातील मौजे टाकळी येथील रस्त्याच्या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला आज माजी खासदार सुभाष वानखेडे व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट देऊन त्याना पाठींबा व्यक्त केला व तात्काळ जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वर चर्चा करून या प्रश्नी तात्काळ कार्यवाही करण्याचे सूचित केले
उमरखेड तालुक्यातील टाकळी ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही यामुळे शाळकरी मुले मुलींना प्रचंड त्रास जाणवत असून वयोवृद्ध नागरिक महिलाना तालुक्यातील किंवा बाजारपेठ दवाखाना व इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी रस्ता नाही. हा रस्ता करावा अशी मागणी त्यानी अनेक वेळा स्थानिक आमदार खासदार सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांच्याकडे केली होती परंतु या मागणीकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी लक्ष दिले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
एवढेच नव्हे तर मागील आठवड्यात याच गावातील एक महिला प्रसूतीसाठी जात असताना रस्त्याच्या अवघड परिस्थिती मुळे त्या महिलेच्या लहान बालकाचा मृत्यू झाला होता. यामुळे जनतेत व टाकली ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता व त्वरित रस्ता दुरुस्ती व कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी केली होती व त्याचाच भाग म्हणून टाकळी ग्रामस्थांनी पूर्व सूचना देऊन रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.
यात महिला लहान बालक वयोवृद्ध नागरिक सुमारे हजारो ग्रामस्थ हे आंदोलन व उपोषणास बसले होते याची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज आंदोलनस्थळी भेट दिली व ग्रामस्थांची चर्चा केली. यात त्यांची मागणी व तीव्र संताप लक्षात घेऊन सुभाष वानखेडे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी त्याना विनंती केली. एवढेच नव्हे तर त्यानी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून टाकळी रस्ता बांधकाम सुरू करण्याची मागणी केली व शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना पाठिंबा व्यक्त केला.