नांदेड। मुळचे बिलोली तालुक्यातील मौजे खतगाव येथील रहिवासी असलेले व नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र बालाजी नामदेवराव खतगावकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रधान खाजगी सचिव पदी अधिकृत नियुक्ती झाली आहे.
सामान्य शेतकरी मध्यवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या व संघर्षमय प्रवास करत आपल्या आयुष्याला वेगळी उंची मिळवून देणाऱ्या व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून नावाजल्या गेलेल्या बालाजी खतगावकर यांची आयुक्त पदावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या प्रधान खाजगी सचिव पदी निवड झाली आहे, नांदेड जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे. बालाजी खतगावकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खतगाव तालुका बिलोली येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण पोस्ट बेसिक आश्रम शाळा वसंतनगर तालुका मुखेड येथे झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथून त्यांचे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या बालाजी खतगावकर यांची लोकसेवा आयोगामार्फत पहिल्याच प्रयत्नात 26 जून 1986 रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद वर्ग एक पदावर निवड झाली.
सुरुवातीस त्यांची प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी) पदी नांदेड येथे निवड झाली, तर मुख्याधिकारी (नगरपरिषद) पदी असताना त्यांनी देगलूर, परळी, हिंगोली, जालना, पनवेल येथे प्रशासकीय कार्यकाळात आपल्या कर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवलेला आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका येथे उपायुक्त तर भिवंडी निजामपूर महानगर पालिका, उल्हासनगर महानगरपालिका व मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. त्यासोबतच तत्कालीन मंत्री अर्जुन खोतकर यांचे प्रधान खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनतर 2019 मध्ये एकनाथराव शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांचे प्रधान खाजगी सचिव म्हणून ते रुजू झाले, नुकतीच एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही त्यांचे प्रधान खाजगी सचिव म्हणून बालाजी खतगावकर यांची नियुक्ती कायम राहिली.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन संघर्ष करत शिक्षण घेतलेल्या व आपल्या गुणवत्तेच्या जोरावर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पदावर पोहोचून थेट मंत्री व त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान खाजगी सचिव होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. अधिकारी पदावर असताना त्यांनी केलेली अनेक सकारात्मक प्रशासकीय कामे आजही लोकांच्या आठवणीत आहेत,त्यासोबतच एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष व आपल्या कामाशी निष्ठा बाळगणारा अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक सर्वत्र आहे. आज घडीस ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान खाजगी सचिव म्हणून अत्यंत निष्ठेने आपले काम पार पाडत आहेत, नांदेड जिल्ह्याच्या या भूमिपत्राची झेप वाखाणण्याजोगी तर आहेच,पण त्यासोबत प्रेरणादायीही आहे.
त्यांच्या या निवडीचे शिवश्री कामाजी पवार, उत्तमराव सोनकांबळे, अनिल तोष्णीवाल, विश्वनाथ कोंढेकर, वसंत नरवाडे, ओमशेठ मानधने, नीलकंठ सूर्यवंशी, डी.एस. पवार, संगमेश्वर लांडगे, नरोजी कोरके, बाबुराव केंद्रे तसेच कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार व सर्व जनतेतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.