अवैध धंद्यांना बळ नेत्याचे की अधिकाऱ्यांचे?
नांदेड। जिल्ह्यात ऐन तारुण्यातील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येते आहे. त्याच अनुषंगाने नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत अवैध मार्गाने सर्रास सर्वच धंदे चालविले जात असून,यावर प्रतिबंध लावण्यासाठी सक्षम अधिकारी कार्यरत नसल्याने दैनंदिन गुन्ह्याचे प्रमाण वाढताना दिसून येते आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तर काम करण्यास मी कम्बर कसून कटिबद्ध असल्याचे दाखवत असतात,पण तुम्ही जर काम करत असाल तर निश्चितपणे गुन्हेगारीवर आळा बसावयास हवा,असे न होता दैनंदिन गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यामुळे पोलिसांच्या कामावर सर्वसामान्य नागरिकांतून संशय व्यक्त केला जातो आहे.
या ग्रामीण पोलीस स्टेशनला शहर व ग्रामीण भाग जोडलेला असून,शहरातील अशी वाढती गुन्हेगारी व ग्रामीण भागातील अवैधरित्या मटका/जुगार,गुटखा विक्री,दारू विक्री,देहविक्री अश्या सर्वच अवैध धंद्यांवर लगाम कधी लागणार? नागरिकांना काम करून दाखविणारा अधिकारी हवाय! मी स्वतः काम करतच आहे हे भासविणारा अधिकारी नकोय! गावठी कट्टे/पिस्टल आढळलेल्या अनेक गुन्ह्यात पोलिसांकडून तपास योग्य दिशेने होत नसल्याचेही समजते आहे,तसेच दि. रोजी ढवळे कॉर्नर सिडको येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी काहींवर पूर्वीपासून गुन्हे दाखल असल्याचेही समजते,पण तपास त्या दिशेने केला गेलाय का? पूर्वीचे गुन्हेशोध घेतला का? ते गंभीर गुन्हे तर नाहीत ना! गंभीर गुन्हे असतील तर यांच्यावर मोक्का लागणार का? असे प्रश्न उपस्थित होताहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या गुन्हेगारी प्रमाणामुळे जनसामान्यांत भीतीचे वातावरण असून,आमची सुरक्षा नेमकं करणार तरी कोण? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. बाल्यावस्थेतून ऐन तारुण्यात आलेली मुले गावठी कट्टे खेळण्यासारखे हाताळत आहेत,हे गावठी कट्टे येतात कुठून? यांना गावठी कट्टे देणारा कोण आहे? याचा तपास पोलीस यंत्रणांनी करावयास हवा,कारण पोलीस तपासातच याचे गौडबंगाल बाहेर येऊ शकेल!