हिमायतनगर। शहरातील नवी आबादी परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे, तर विद्यार्थी संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक नसल्याचे वारंवार शिक्षक देण्याची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने आज संतप्त झालेल्या पालकांनी येथील उर्दू शाळेला कुलूप लावले आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण यांनी मागण्याचे निवेदन दिले.
गटशिक्षणाधिकाऱ्याने पालकांशी संवाद साधून शिक्षक नसल्याचे निदर्शनास आणून दिलले, तसेच नवीन उर्दू माध्यमाचे शिक्षक येताच शिक्षक दिले जातील असे दिलेल्या आश्वासनानंतर शाळेला लावलेले कुलूप काढण्यात आले आहे. एकूणच हिमायतनगर तालुक्यातील बहुतांशी शाळावर शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाचे नुकसान होत असून हिमायतनगर तालुक्यातील रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरून शैक्षणिक पाया नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी तातडीने या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेदभाई, नगरसेवक अन्वर खान यांच्यासह परिसरातील पालक, राजकिय नेते, यासह विद्यार्थी उपस्थित होते.
