हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव जळगावकर यांचे हदगाव येथील घर फाेडून चोरट्यांनी अंदाजे २०० अँड्रॉइड माेबाइल लंपास केल्याची घटना समाेर आली.
आ. माधवराव पाटील जळगावकर हे आपल्या कुटुंबीयांसह नांदेडच्या हनुमानगड परिसरात राहतात. आपल्या मतदारसंघातील विविध कामांसाठी त्यांचे हदगाव येथे निवासस्थानाखाली संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात मतदारसंघातील दिव्यांगांना वाटप करण्यासाठी अँड्रॉइड मोबाइल आणले होते.
जवळपास २०० हून अधिक मोबाइल त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयातील किचन रूममध्ये ठेवले होते. परंतु, चोरट्यांनी शनिवारी दि.२० ऑगस्ट च्या रात्री त्यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्य दार तोडून किचन रूमचा दरवाजा उघडला. किचन रूममध्ये ठेवलेले मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून त्यांच्या घरामध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येते आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी श्वान पथकासह भेट देऊन पाहणी केली आहे.
