लाल ध्वज काढलेले प्रकरण व भूखंड घोटाळ्याची फेर चौकशी करण्याची केली निवेदनाद्वारे मागणी
नांदेड| मौजे वाघी ता.जि.नांदेड येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मध्ये नेहमीप्रमाणे लावण्यात आलेला लाल ध्वज गेल्यावर्षी तहसीलदार नांदेड यांनी काढल्याचे प्रकरण मागील वर्षभरापासून विविध कारणांनी गाजत आहे. या प्रकरणात वाघी येथील मातंग समाजाच्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदे समोर अनेक आंदोलने व उपोषणे केली आहेत.शांतता कमिटीच्या बैठका देखील झाल्या आहेत परंतु तोडगा निघण्याऐवजी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे जाणीवपूर्वक केले गेले आहे.
ज्या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंच्या जयंती निमित्त लाल ध्वज लावला जात होता त्या ठिकाणी नव्वद टक्के राहिवास हा मातंग समाजाचा आहे. तेथे मागील २० ते २५ वर्षांपासून जयंतीसह विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. त्या ठिकाणी पाच गुंठे जमीन वस्तीतील लोकांसाठी खुले मैदान म्हणून राखीव आहे. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आले असून मंदिराच्या नावाने पाच गुंठे जमीन बळकावन्याचा काही लोकांचा मानस आहे. तेथे जमीन घोटाळा देखील झालेला आहे. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करावी व वस्तीमध्ये राहिवास असणाऱ्या मातंग समाजास ती जागा वापरासाठी परवानगी द्यावी ही एकमुखी मागणी बहुसंख्य लोकांची आहे.
परंतु ग्रामसेवक, विस्तारअधिकारी, लिंबगांव पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नसल्यामुळे तेथे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. वाघीच्या झेंडा वंदन करण्याच्या जमिनीवर फौजदारी संहिता १९७३ चा वापर करून कलम १४५ लावण्यात आले आहे. तसेच ती जमीन शासन जमा करून घेण्यात आली आहे.
तेथील कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करण्यासाठी लिंबगांव पोलीस प्रयत्नशील आहेत. अशा तक्रारी यापूर्वीच तेथील लोकांनी वरिष्ठाकडे केल्या आहेत. हा ऑगस्ट महिना अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीचा असल्यामुळे वाघी येथील मातंग समाजाचे लोक कलम १४५ हाटविण्यासाठी शासन दरबारी खेटे मारत आहेत. दिनांक १९ ऑगस्ट रोजी अनेक महिला पुरुषांनी जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.तसेच या प्रकरणाची फेर चौकशी करून न्याय द्यावा व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून निवेदनाच्या प्रति जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्यासह तहसीलदार नांदेड यांना दिल्या आहेत.
निवेदनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, गजानन खुणे,रमेश गायकवाड, सुरेश गायकवाड, बालाजी भोसले, चंद्रकांत खुणे, कॉ.गंगाधर खुणे, रुपेश जाधव, शेषेराव खुणे, शिलाबाई गजले,धुरपत बाई खुणे,ज्योती गायकवाड, सुशिलाबाई जाधव,निलाबाई दस्तके, चांगुनाबाई खुणे,संगीता खुणे,गयाबाई दस्तके,रेवता दस्तके, सुनिता गायकवाड, विश्रांती गायकवाड, गयाबाई गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोजे वाघी येथे सिटू सलग्न असंघटित कामगार संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली असून तेथील अनेक कामगार संघटनेचे सभासद झाले असल्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.