श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण; भिखू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नांदेड| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझा समाज आणि देश यापैकी एकाची निवड करण्याघी वेळ आली तर मी राष्ट्राला प्राधान्य देईन असा विश्वास बाबासाहेबांनी व्यक्त केला होता. बाबासाहेब हे प्रखर राष्ट्रवादी होते. प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय हा राष्ट्रवाद जोपासतांना धम्म प्रशिक्षणासोबतच राष्ट्राला प्राथमिकता देण्याचे महत्कार्य भदंत पंय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघाकडून घडत आहे असे गौरवोद्गार आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ध्वजारोहण प्रसंगी काढले.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात 55 फुटी उंचीचा व बारा बाय आठ फुटाचा तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भंते पंय्याबोधी थेरो, नालंदा बिहार येथून आलेले भंते सूर्यपांजो , भिक्खू संघ व श्रामणेर संघ, डॉ. सिद्धार्थ जोंधळे, माजी प्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, उमाजी नरवाडे, साहेबराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, रवी नरवाडे, नागोराव नरवाडे, सुकेशनी गोधने, कुंदन ठाकूर, प्रमुख शहीद भगतसिंग ग्रुप पूर्णा, प्रफुल्लता वाठोरे, दैवशिला गायकवाड, अनिता नरवाडे, भीमराव हटकर ,सागरबाई नरवाडे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण केंद्रात हर घर तिरंगा या मोहिमेविषयक जनजागृती करण्यात आली. तसेच केंद्राच्या वतीने शंभर गरीब कुटुंबांना राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण करण्यात आले होते. १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत ध्वज फडकवतांना ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आवाहनही करण्यात आले होते.
ध्वजारोहण प्रसंगी भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, प्रत्येक देशवासीयाने ध्वजावरील अशोक चक्राचा योग्य सन्मान ठेवावा, अशोकचक्र विरहित काही ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी याप्रसंगी पंय्याबोधी यांनी केली. भंते सूर्यपांजो नालंदा बिहार यांनी बोलतांना श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील कार्याची प्रशंसा केली. पूर्णा येथील शहीद भगतसिंग ग्रुपच्या वतीने हा ५५ फुट उंचीवर फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज श्रामणेर शिबिरास दान देण्यात आला.