नांदेड| छत्तीसगड येथे वर्षभरापुर्वी झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले मुखेड तालुक्याचे भुमीपुत्र सुधाकर शिंदे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. शहिद सुधाकर शिंदे यांची शिक्षणाची आवड पाहता त्यांच्या परिवाराने त्यांचा वसा कायम ठेवत दि. 20 ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असून शहीद सुधाकर शिंदे यांचे बलिदान सदैव विद्यार्थ्यांच्या मनात रहावे आणि विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी पुढे यावे हा त्यामागचा हेतु असल्याची माहिती शहीद सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा शिंदे यांनी दिली.
शहीद सुधाकर शिंदे यांना लहानपनापासूनच शिक्षणाची आवड होती. स्वत:ही शिक्षण घ्यावे आणि इतरांनीही शिक्षणाचा प्रवाहात यावे यासाठी ते नेहमी धडपड करत असत परंतु घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शेतमजूरी तर कधी वाळु चाळण्याचे काम करत त्यांनी शिक्षण घेतले. सन 2004 मध्ये हिमाचल प्रदेश शिमला येथे आयटीबीपीमध्ये भरती झाले होते. सन 2004 ते 2021 या काळात त्यांनी विविध पदावर काम केले. हिमाचल प्रदेश, जम्मु कश्मिर, हरीयाणा, पंजाब, दिल्ली, छत्तीसगड या राज्यात त्यांनी सेवा बजावली. नेपाळचा भुकंप, कर्नाकट मधील पुर परिस्थिती तर ग्रेटर नोएडा शाहेबरी येथील इमारती कोसळल्यानंतर बचावकार्यात पुढकार घेत शेकडोंचे प्राण वाचवले.
देशसेवेबरोबरच समाजसेवा करण्यात नेहमी त्यांचा पुढाकार असायचा गरजवंताना अन्न धान्याची मदत तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम शहीद सुधाकर शिंदे नेहमी राबवत असत. नारायणपुर छत्तीसगड येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात त्यांना विरमरण आले. या घटनेच्या पाच दिवसापुर्वीच त्यांनी नारायणपुर येथे भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. ध्वजारोहन केल्यानंतर त्यांनी गावकर्यांना गरजु वस्तुंचे वाटप देखील केले होते.
देशसेवेबरोबर समाजसेवेत अग्रेसर असलेल्या शहीद सुधाकर शिंदे यांना 20 ऑगस्ट रोजी 2021 रोजी विरमरण आले. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात रहावे तसेच शहीद सुधाकर शिंदे यांच्या समाजसेवेचा वसा कायम ठेवण्याचा निर्णय परिवाराने घेतला आहे. त्यानिमित्ताने शनिवार दि. 20 ऑगस्ट रोजी त्यांचा प्रथम स्मृतीदिन असून मुखेड तालुक्यातील बामणी या त्यांच्या जन्मगावी प्रथम स्मृतीदिनानिमित्त करिअर मार्गदर्शन शिबीर व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शहीद सुधाकर शंदे यांच्या पत्नी सुधा सुधाकर शिंदे यांनी दिली.