हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा -NNL

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला असून, समाजकार्य, महिला महाविद्यालयासह वसतीगृहास मंजुरी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याने खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 


हिंगोली|
मराठवाडा विभागातील अविकसित अशा हिंगोली सारख्या जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात असलेला असमतोल दूर करण्यासाठी जिल्ह्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, समाजकार्य  महाविद्यालय, महिला महाविद्यालय आणि मुलां – मुलींसाठी स्वतंत्र राहण्यासाठी वसतीगृहाची सोय होणार असल्याची माहिती हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. सदरील महाविद्यालयास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याने शैक्षणिक असमतोल दूर होण्यास मदत होणार असल्याने हिंगोलीतील विद्यार्थी व नागरिकांसाठी ही सुवर्ण उपलब्धी आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी सहा आँगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोली जिल्ह्यातील शैक्षणिक असमतोल दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच समाजकार्य महाविद्यालय, महिला महाविद्यालय आणि मुलां मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची सुविधा मिळावी म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना तपास करुन तात्काळ आहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे हिंगोलीसारख्या अविकसित जिल्ह्यात विविध विकास कामे खेचुन आणण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेत असतात. 

खासदार पाटील यांच्या या विकसीत धोरणामुळेच जिल्ह्याचा हळूहळू सर्वांगीण विकास होताना दिसत आहे. कमी अवधितच जिल्ह्यास शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन विविध विकास योजना जिल्ह्यासाठी आणत आहेत. ही जिल्ह्याच्यादृष्टीने गौरवास्पद बाब ठरली आहे. याच विकास योजनेचा भाग म्हणून जिल्ह्यासाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रास शंभर कोटी रुपये मंजुर करुन घेतले आहेत.आता लवकरच जिल्ह्यातील शैक्षणिक असमतोल दूर होऊन हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्याचे उच्चशिक्षणाचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी