राज्यातील पाचशे विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
नांदेड। राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( यूपीएससी ) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता दिल्लीमध्ये हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समग्र क्लासेस सेंटर व वस्तीगृह होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीची त्वरित दखल घेऊन, मुख्यमंत्री यांनी पाचशे विद्यार्थ्यांसाठी लवकरच क्लासेस सेंटर व वस्तीगृह सुरु करण्याची घोषणा केली आहे.
दिल्ली हि यूपीएससी अभ्यासाचे माहेरघर समजली जाते. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी दिल्लीला येतात. महाराष्ट्रातून दिल्लीत येणाऱ्या विद्यार्थीची संख्या मोठी आहे. या स्पर्धापरिक्षेच्या माध्यमातून दरवर्षी किमान ७० पेक्षा अधिक विद्यार्थी आयएएस, आयपीएस होतात. मात्र राज्यभरातील शेतकरी व सामान्य कुटुंबातील अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खर्च परवडत नाही. दिल्लीत राहणे, खाणे व शिकवणी वर्गासाठी त्यांना महिण्याला किमान २० हजार रुपयापर्यंत आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. हा खर्च अमाप असल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेची तयारी अर्ध्यावर सोडून आपल्या स्वप्नांना मुरड घालुन गावी परतावे लागते.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातून यूपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आनंदाचे वातावरण पसरले आहे. समाजातील सर्व वर्गाला न्याय मिळावा या उद्देशाने अनेक निर्णय आणि मागण्या केल्या असून क्लासेस सेंटर व वस्तीगृह मागणी सुद्धा विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे.