नांदेड| महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय(आरटीओ) सिडको, नांदेड येथे महाएनजीओ फेडरेशन व कै सोपानराव तादलापुरकर क्रीडा मंडळाच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबवित एक सामाजिक, पर्यावरणीय संदेश यावेळी दिला.
वृक्षारोपण कार्यक्रमाला नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, एआरटीओ कंत्तेवाड, तेजस्वीनी कलाले, संचालीका माहेश्वरी तादलापुरकर, देविदास डोम्पले, महेश तादलापुरकर, डॉ. मनीष कंधारे, गणेश तादलापुरकर, संदीप कदम, निलेश तादलापुरकर, ज्योती शिंदे, साधना गायकवाड आदी उपस्थित होते. आरटीओ कार्यालय परीसरात यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत माहेश्वरी तादलापुरकर यांनी व्यक्त केले. महाएनजीओ फेडरेशन व कै सोपानराव तादलापुरकर क्रीडा मंडळ यांच्या या सामाजिक उपक्रमाचे आरटीओ राऊत यांनी कौतुक केले.
मानव आणि निसर्ग यांच्यात जुना संबंध आहे. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानव या निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. तसेच झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. झाडांचा मानवाच्या जीवनात खूप महत्त्व असल्याचे एआरटीओ कलाले यांनी सांगितले . संचलन व आभार देविदास डोम्पले यांनी मानले.