प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांची माहिती
नांदेड,| जिल्ह्यात पूर्व प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून 288 केंद्रावर दिनांक 31 जुलै 2022 रोजी परीक्षा होणार असून 30 हजार 395 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी आज दिली.
परीक्षेचे नियोजन, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरण आणि परीक्षेदरम्यान करावयाची कार्यवाही या संदर्भाने आज मल्टीपर्पज हायस्कूल नांदेड येथे परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या सर्व केंद्र संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के आणि अर्धापूरचे गट शिक्षणाधिकारी आर. एल. ससाने होते.
इयत्ता पाचवीसाठी 181 केंद्र इयत्ता आठवीसाठी 107 केंद्र अशा 288 केंद्रावर परीक्षा होणार असून इयत्ता पाचवीसाठी 17 हजार 792 तर आठवीसाठी 12 हजार 603 असे एकूण 30 हजार 395 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. प्रत्येक केंद्रासाठी 1 केंद्र संचालक नियुक्त करण्यात आला आहे. 300 च्या वर पटसंख्या असलेल्या 7 शाळा असून या ठिकाणी केंद्र संचालकांसह सहकेंद्र संचालक नियुक्त करण्यात आले आहे. या सर्वांची बैठकीस उपस्थिती होती.
संबंधित गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी यांना या परीक्षेच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या आहेत. विद्यार्थी व पर्यवेक्षित विद्यार्थ्यांना परीक्षे संदर्भात अडचण आल्यास त्यांनी आपल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना संपर्क करावा आणि मुख्याध्यापक- शिक्षकांना काही अडचण आल्यास त्यांनी आपल्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा आणि मनमोकळ्या वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.