नांदेड| नांदेड ते जैतापूर रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून या भागात लुटमारीचा सुळसुळाट झाला असून या भागातील रहाटी येथील मंगेश रामराव ओमणवार व जैतापुर येथील काशीनाथ सरोदे या दोघांना लुटले असून अशाच प्रकारच्या चोर्या व लुटमारीच्या घटनात वाढ झाली आहे.
काशीनाथ सरोदे यांचे अंदाजे 10 हजार रूपये लुटूून, दोन मोबाईल हिस्कावून घेवून त्यांना व त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. मंगेश ओमणवार यांचा 24 हजाराचा मोबाईल घेवून त्यांना मारहाणही केली. या घटनांमुळे नांदेड ते जैतापूर रस्ता हा रात्रीच्या वेळी असुरक्षित झाला आहे. या रस्त्यावर सायंकाळ झाली की रहदारी बंदच झाल्याचे दिसून येत आहे. दररोज अशा घटना होत आहेत. या भागातील गावातून गावकरी नांदेडला कामाला येत असल्याने त्यांचा परतीचा प्रवास हा जिवघेणा होत आहे.
हस्सापूर येथे असलेली पोलीस चौकी काढून नेण्याचाही प्रकार प्रशासनाकडून झाला होता. मात्र शिवसेना संघटक नवनाथ काकडे यांनी तात्काळ आ.बालाजी कल्याणकर यांना याची कल्पना देताच आमदारांनी लिंबगाव पोलीस प्रमुखांशी संपर्क केल्याने चौकी जाग्यावर आली. या भागातील लोकांना असर्जन मार्गे विष्णुपूरी शासकीय दवाखान्यासाठी जावे लागते.
हा परिसर लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून पेट्रोलिंग होत नसल्यानेच चोरटे व लुटारूंना अभय मिळत आहे. पेट्रोलिंग लावून होणार्या घटना थांबवाव्यात. पोलीस प्रशासनाने या भागात रात्रीची गस्त लावून होणार्या लुटमारीच्या घटनावर पायबंद घालावा, अशी मागणी पत्रकार आनंदा बोकारे यांनी केली आहे.