नांदेड| पन्नास हजार रुपये मागितल्यानंतर देण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर दोन जणांनी तलवारीने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना दि.१७ जुलै रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे मेंढका गावात घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुदखेड तालुक्यातील मौजे मेंढका गावातील सतीश शामराव हाटकर हे दि.१७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता नरवाडे यांच्या किराणा दुकानाजवळ थांबले होते. यावेळी अविनाश सिद्धार्थ निखाते आणि संजय गणपत निखाते या दोघांनी त्यांना ५० हजार रुपये मागितले.
माझ्याकडे पैसे नाहीत आणि कशाचे पैसे मागतोस, अशी विचारणा केली असता अविनाश निखातेने आपल्या पाठीमागील खोवलेली तलवार काढली. आणि सतीश हाटकरच्या डाव्या दंडावर मारली. तो वार अडवण्यासाठी हात वर केला असता डाव्या हाताच्या तळहातावर आणि उजव्या छातीवर गंभीर दुखापत झाली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी संतोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवि अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.