नांदेड। डॉ.बालाजी कोंपलवार यांच्या सुविद्य पत्नी प्रा.डॉ. ललिता बालाजी कोंपलवार यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वाकद ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रा.डॉ.ललिता अलसटवार (कोंपलवार) अर्धापूर येथील हुतात्मा पानसरे महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या होत्या. प्रा.डॉ.ललिता अलसटवार यांनी त्या काळात हुंडा न घेणार्या व्यक्तीशी विवाह करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यातूनच डॉ.बालाजी कोंपलवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वातंत्र्य सैनिक अलसटवार यांच्या त्या कन्या होत्या. सर्वोदय नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या मानस कन्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या.
प्रा ललिता कोंपलवार राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन, गांधीवादी चळवळीत सक्रिय सहभागी होत्या. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत देखील त्यांचा सहभाग होता. सतत हसतमुख असणारे व दिलदार व्यक्तिमत्व, अभ्यासिका व लेखिका असणारे आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आज (शुक्रवार) दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात वाकद (आनंदधाम) ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
