किनवट, माधव सूर्यवंशी| किनवट शहरापासून दीडशे तर मांडवीपासून नांदेड दोनशे किलोमिटर लांब असल्याने किनवट येथे त्वरित आरटीओ कार्यालय सुरू करा, अशी मागणी पालिकेचे उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, किनवट चे आमदार भीमराव केराम, व नांदेड येथील विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोकुंदा येथे दर महिन्याला आरटीओ कॅम्प होत असे. या कॅम्पमुळे किनवट शहरासह परिसरातील वाहनधारकांची आरटीओशी संबंधित कामे सुलभ होत होती. सदर कॅम्प बंद असल्याने वाहनधारकांना विविध परवाने, परवानगी, फिटनेस, वाहन पासिंग अशा विविध कामांसाठी किनवट शहरापासून दीडशे, तर मांडवीपासून दोनशे कि.मी. दूर असलेल्या नांदेडच्या कार्यालयात जावे लागत आहे. ही बाब खर्चिक असून, वेळेचाही अपव्यय होत आहे. तेव्हा किनवट येथे अतिदुर्गम आदिवासी तालुक्यात आरटीओ कार्यालय सुरू करावे, अशी मागणी पालिकेचे उपाध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार यांनी केली आहे.