बीड| शहरात अज्ञात चोरट्यांनी चक्क पोलिस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी करून हात साफ केला. यात १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून, रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
बीड शहरातील गंगाधाम परिसरात पोलीस निरीक्षक महादेव राऊतयांचा घर आहेत. काही कामानिमित्ताने ते दि. १५ ते १७ जुलै दरम्यान घर बंद करून बाहेरगावी गेले होते. या काळात चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधून कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ३५ हजार रुपये किमतीची १ तोळ्याची अंगठी, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे करंडे, १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे ताट आणि ७० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
चोरीचा प्रकार उघडकीस येताच शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली गेली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण केले गेले होते. याप्रकरणी सुवर्णा महादेव राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.