नागपूर/औरंगाबाद| राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीतून देशातील तीर्थस्थळांचा व पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वरला येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांच्या-पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद-घृष्णेश्वर-वेरूळ या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
6 किमी लांबीच्या या महामार्गामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल. तसेच भाविकांना व पर्यटकांना घृष्णेश्वर मंदिर व मंदिराजवळील प्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेण्यांपर्यंत पोहाेचवणे सुलभ होईल. औरंगाबाद व अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे जोडली जातील. परिसरातील पर्यटनाचा हा ऐतिहासिक वारसा तसेच शैक्षणिक, विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास जगाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल.
भीमाशंकरला जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर या राज्य मार्गालाही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येईल. ७० किमीच्या या महामार्गामुळे राजगुरूनगर (खेड) चार, वाडा, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जातील. भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण तसेच भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल. परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहाेचवणे सुलभ होईल, शैक्षणिक व औद्योगिक विकास साधता येईल.