कंधार। महिन्या भराच्या पावसाळ्यात गेले ५ दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी- नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील उभी पिके, जमिनीसह वाहून गेली. तर बहुतांश ठिकाणची पिके सडून गेली आहेत.
मागील अनेक वषार्पासून बळीराजा आर्थिक नुकसानीत येत असताना यावर्षी त्याहीपेक्षा बिकट स्थिती म्हणजे कोवळ्या पिकांची झाली आहे. परिणामी संततधार पाऊस सुरु असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी जिल्हाभरात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत करावी आशी मागणी युवा नेते ओम लाला ठाकूर यांनी केली आहे. जिल्हाभरात सततच्या पावसामुळे शेतधूरे, बंधारे, जादा पावसाने तूटफुटीत आले असून, नदीकठा लगतचे शेतजमिनीखरडून गेले आहे.
शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप आले असून, या पावसामुळे अनेक पुलावरून पाणी जात असल्याने विविध गावाचा संपर्क तुटलेला आहे. तर अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने मातीच्या घरासह चांगल्या घरांची देखील पडझड झाली आहे. यामुळे जनजीवन विसकळीत झाले असून, अशी बिकट परिस्थिती बळीराजावर आली असुन शासनाने आता पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी ओम लाला ठाकूर यांनी केली.