नांदेड| आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे देगलूर येथील एका महिलेचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तर मुखेड तालुक्यातील शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका मजुराचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, देगलूर तालुक्यातील लेंडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. सविता दत्तात्रय डाकोरे (३७) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुखेड तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी सविता डाकोरे या मजुरीचे काम करतात. त्या भोकसखेडा येथील नामदेव डाकोरे यांच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी परतत असताना नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्यात पडून त्या वाहून गेल्या. १० जुलै रोजी त्यांचा मृतदेह सापडला. देगलूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.