नांदेड, अनिल मादसवार| गेली आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे. तसेच परिसरात झालेले नाल्याचे व तलावाचे पाणी नदीत मिसळत असल्याने पर्यटकांना 'भुरळ' घालणारा सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. येथील कड्याकपाऱ्यावर पडणाऱ्या पावसाच्या थेंब आणि धबधब्यातून उडणारे फवारे परिसरात वृक्षवल्लीने पांघरलेले हिरवा शालू परिधान केल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना खुणावत आहे.
१०० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा प्रचंड क्षमतेने वाहू लागला आहे. त्यामुळे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले आपसूकच सहस्त्रकुंडकडे वळत आहेत. नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या आणि इस्लापूर रेल्वे स्थानकापासून ३ किमीवर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे. निसर्गनिर्मित्त धबधब्याच्या विहंगम दृश्यापासून वंचित पर्यटकांच्या डोळ्याचे आता पारणे फिटणार आहेत. छाया- विजय अल्पेवाड (नांदेड न्युज लाइव्ह)