शोध कार्यासाठी सपो निरीक्षक देवकते आणि त्यांचे टीमने घेतलेल्या परिश्रमाला यश
उस्माननगर, माणिक भिसे। मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील परिसरात अनेक भागात पुराने थैमान घातले असताना अर्धापूर तालुक्यातील लहान येथील अंकुश सावंत यांचे मृतदेह नायगाव तालुक्यातील कहाळा येथील नाल्याच्या पात्रात आढळून आले आहे.
दि.९ जूलै रोजी पेठवडज येथून नांदेडकडे जात असताना चिखली येथील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता .सदरील युवकाची दुचाकी दहीकळंबा येथील पुलाला अडकली होती. मात्र युवकाचा थांग पत्ता लागत नव्हता अशा परिस्थितीत उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते आणि त्यांच्या टीमने कठोर परिश्रम घेऊन अखेर तिसऱ्या दिवशी सदरील युवकाचा मृतदेह शोधण्यात यशस्वी झाले , मृतदेह तपासणीनंतर कुंटुर पोलिसांच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकाला स्वाधीन करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की ; अर्धापुर तालुक्यातील लहान येथील व हल्ली मुक्काम बारुळ येथे राहत असलेले आणि विष्णुपूरी येथील हाॅटेल मॅनेजमेंट काॅलेजचे प्राचार्य अंकुश सावंत यांची पत्नी पेठवडज येते आरोग्य विभागात कार्यरत आहेत. दिनांक ९ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंकुश सावंत हा आपल्या चुलत बहिणीच्या विवाहासाठी नांदेडकडे आपल्या दुचाकीवरून निघाला होता तत्पूर्वी रात्रभर झालेल्याअतिवृष्टीमुळे कंधार आणि लोहा तालुक्यातील अनेक नाल्यांना पूर आला होता .
अंकुश सावंत आपल्या दुचाकीवरून येत असताना चिखली येथील नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सावंत यांना रोडवरील खड्याचा अंदाज न आल्याने गाडी खड्यातल्या पाण्यामुळे गाडी पडली आसावी व वाहत्या प्रवाहात पुराच्या पाण्यात ते दुचाकी सकट वाहून गेले होते. दहीकळंबा येथे दि. ९ जुलै रोजी त्याची दुचाकी ग्रामस्थांना आढळून आली. दुचाकीवरील नंबर वरून अंकुश सावंत यांची दुचाकी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकाला संभाधितानी माहिती कळवली. अंकुश सावंत यांच्या नातेवाईकांनी तातडीने दहीकळंबा गाठून दुचाकीची शहानिशा केली. दुचाकी अंकुश सावंत याचीच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र दिनांक नऊ जुलै च्या दिवसभर अंकुश सावंत यांचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर उस्माननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिसिंग ची तक्रार अंकुश यांच्या काकांनी नोंदवली. मिसिंग ची तक्रार नोंदवल्यानंतर उस्माननगर पोलिसांनी शोधकार्यासाठी आपली टीम कामाला लावली.
दरम्यान या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनाही कळवण्यात आले होते ; जिल्हाधिकारी यांनीही या प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणेला शोध कार्य गतिमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासोबतच कांधरचे उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. कंधार आणि लोह्याच्या तहसीलदारांनी मदत कार्यासाठी उस्माननगर पोलिसांना पाठबळ दिले. उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी ज्या मार्गाने पाणी वाहत आहे त्या मार्गाने पाण्याचा अंदाज घेत टीमसह दिनांक दहा जुलै रोजी दिवसभर शोध घेतला .मात्र अंकुश सावंत याचा शोध लागला नाही.
त्यामुळे पोलिसांसमोर अंकुश सावंत यांचा शोध लावणे मोठे आव्हान होते. या कामात कुंटूर पोलिसांनी ही माहिती मिळाल्यानंतर बरबडा बळेगाव कहाळा, पाटोदा आधी भागात शोध मोहीम राबवली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मार्फत ही शोध मोहीम सुरू ठेवली होती. आज दिनांक ११ जुलै रोजी पोलीस निरीक्षक देवकते यांनी आज पुन्हा शोध नेहमेला सुरुवात केली .यासाठी दोन सत्रात ही शोध मोहीम घेण्याचे ठरवण्यात आले .
उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी तहसीलदार बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी तलाठी यांची टीम तयार केली. मंडळ अधिकारी सहारे, कटारे, तलाठी मोतीराम कदम, मनोज जाधव, संतोष जाधव, बोधगिरे, चिलकेवार, मद्देवाड, दुधाटे, असकुलवार, मंडळ अधिकारी गिरडे, येडे, श्रीमती कदम यांचा या टीम मध्ये सहभाग होता. दि.११ रोजी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या शोध मोहिमेत आहे. दहीकळंबा, उमरा, जोमेगाव, धनज खुर्द या मार्गे कहाळापर्यंत शोध कार्य सुरू असताना कहाळा खुर्द येथील नाल्याच्या पात्रात कडेला अंकुश सावंत याचा मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक
ज्ञानोबा देवकते यांनी मृतदेह अंकुश सावंत याचा असल्याची खात्री केल्यानंतर हे घटनास्थळ कुंटूर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पुढील पंचनामा व मदतकार्यासाठी कुंटूर पोलिसांना सूचना देण्यात आल्या. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी क्षणाचा विलंब न लावता बीट जमादार सोनकांबळे यांना घटनास्थळी पाठवून मृतदेहाचा पंचनामा केला. बरबडा येथील वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यकांना बोलून मृतदेहाची उत्तरिय तपासणी घटनास्थळावरच करण्यात आली. त्यानंतर मृतदेह अंकुश सावंत यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आला.
गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेले शोध कार्य अखेर आज आज दुपारी तीनच्या सुमारास थांबले. उस्माननगर पोलिसांच्या अथक परिश्रमातून अंकुश सावंत याचा अखेर शोध लावण्यात यश आले. मात्र सावंत कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकुश सावंत विवाहित असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.