नांदेड| सामान्य माणसाने कोर्ट, पोलीस ठाणे, दवाखान्याची पायरी चढू नये असे वर्षानुवर्षे ज्येष्ठ मंडळी सांगत असतात. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने या तिन्ही घटकांची पायरी चढावी लागल्यावर अनेकांना आलेले अनुभव वेगवेगळे असतात. शहरातील मध्यवस्तीतील एका दुकानात ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने मालकाचा मोबाईल चोरुन नेला. ही बाब उघड होईपर्यंत वजिराबाद गुन्हे शोध पथकाने चोराला पकडूनच दुकानात आणल्याचा सुखद अनुभव एका व्यापाऱ्याला आला आहे.
शहरातील सुभाष मार्गावर डॉ.लव्हेकर हॉस्पिटल शेजारी न्यू गिरीश फोटो स्टुडिओ आहे. त्याचे मालक गिरीश बाऱ्हाळे असून शुक्रवारी, २१ जुलै रोजी दुपारी ३ ते साडे तीनच्या दरम्यान त्यांच्या दुकानात एक तरुण अर्जंट फोटो काढायचे म्हणून आला. व्यवहाराचे बोलणे होत असताना गिरीश हे संगणकावर आपले काम करु लागले आणि मोबाईल टेबलवरच ठेवला. ते कामात गुंग असल्याचे पाहून ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने त्यांचा मोबाईल हातोहात लंपास केला. आपल्या हातावरचे काम आटोपल्यावर गिरीश यांनी मोबाईल पाहिला तर जागेवर नव्हता. दुकानात व मागे असलेल्या घरीच त्यांनी शोधाशोध सुरु केली. बघता बघता दोन तास झाले.
सायंकाळी ६ वाजता तर वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी चोरासह मोबाईल घेऊन दुकान गाठले. गिरीश यांचाच हा मोबाईल आहे का, पावती वगैरेची खात्री करुन घेतली आणि सुखद धक्का दिला. गिरीश यांचा चोरलेला मोबाईल तर परत मिळालाच परंतु चोरही पकडल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत. ही कामगिरी वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सपोनि निकम, सपोनि संजय नीलपत्रेवार, मनोज परदेशी,शरद चावरे, व्यंकटी गंगुलवार,संतोष बेलुरोड, रमेश सूर्यवंशी यांनी पार पाडली. त्यामुळे व्यापारी वर्गाने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.