नांदेड| सकाळ माध्यम समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना 'महाराष्ट्राची सावित्री' या सन्मानाने गौरविण्यात आले. समाजातील वंचित, दुर्लभ घटकांतील महिलांची बचतगटाच्या माध्यमातून मोट बांधून त्यांना आर्थिक साक्षर करून निरोगी आरोग्य आणि समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी आत्मनिर्भर असणे गरजेचे आहे हि जाणीव महिलांमध्ये निर्माण करून दिल्या बद्दल गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना "महाराष्ट्राची सावित्री "या पुरस्काराने पद्मश्री कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सकाळ माध्यम समूहाच्या वतीने शनिवारी (ता.२३) पुणे येथील हॉटेल मॅरीगोल्ड इथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सिनेअभिनेते अजय पुरकर, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, संपादक व लेखक संघटक संदीप काळे, पत्रकार सुरेखा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जागर सावित्रीचा या लेखमालेच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूहाने समाजासाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांची दखल घेतली असून, त्या करीत असलेले कार्य जनसामन्यापर्यंत पोहचले पाहिजे या उदात्त हेतूने हि लेखमाला चालविली होती. या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणाऱ्या महिलांची अवघ्या महाराष्ट्राला ओळख तर झालीच आहे. परंतु त्यांचे कार्य अजून ठळकपणे आणि कायमस्वरूपी महाराष्ट्रासमोर असावे, त्यांच्या सामाजिक कार्याचा व्यासपीठावर सन्मान व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राची सावित्री या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महिला जोपर्यंत मुख्य आर्थिक प्रवाहात येऊन आर्थिक स्वावलंबी होत नाही तोपर्यंत त्यांना एक व्यक्ती म्हणून सन्मान मिळत नाही हे लक्षात घेऊन आर्थिक साक्षरता शिबीर, उद्योजकता विकास शिबीर घेऊन अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास पाठबळ दिले. आर्थिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक,क्रीडा, युवा सक्षमीकरण आदी क्षेत्रातही राजश्री पाटील यांचे योगदान खूप महत्वाचे आहे.याची दखल घेत सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राजश्री पाटील यांचा "महाराष्ट्राची सावित्री" हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, साडीचोळी व सुगंधित चाफ्याचे झाड अशी माहेराची किनार असलेले होते.
यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रातील छत्तीस महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेतलेल्या महाराष्ट्राची सावित्री या लेखमालेचे पुस्तकरूपात प्रकाशन करण्यात आले. संपादक लेखक निवेदकसंदीप काळे यांनी लिहिलेल्या 'वूमन पॉवर' या मराठी हिंदी इंग्रजी या तीनही भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. गावकुसात वाढलेल्या संदीप काळे यांनी मुंबईत माध्यमक्षेत्रात मोठी झेप घेतली तरी आपल्या मूळ सामाजिक संस्काराला त्यांनी कायम जपले आहे . लपलेल्या हिरकणींना या निमित्ताने त्यांनी शोधून काढून सन्मानित केले यासाठी सर्वच मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले.
या पुरस्कार सोहळ्यात सर्व महिलांच्या वतीने राजश्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, पुरस्काराने आपल्याला बळ मिळते हे खरे असले तरी जबाबदारी अनेक पटीने वाढते. इथे पुरस्कार प्राप्त माझ्यासह सर्व महिलांनी विवध क्षेत्रात एक ते दोन दशकापूर्वी पासून काम सुरू केलं आहे. या पुरस्कारामुळे त्याला आज कुठे मूर्त रूप आलं आहे,असं सर्वांना वाटत असेल पण आपलं काम अजूनही संपल नाही तर सकाळच्या कौतुकामुळे अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.